दिनांक: २७ फेब्रुवारी २०२५
वेळ: सकाळी ८.३० वा.
स्थळ: सेंट मेरीज हायस्कूल पटांगण
मुख्य अतिथी: श्री. दीपक वेलणकर
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सेंट मेरीज हायस्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाने झाली. त्यानंतर सर्वांनी विश्वप्रार्थना व सरस्वती वंदना म्हणत ज्ञानाची आराधना केली. पाहुण्यांनी व मुख्याध्यापकांनी वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली.
यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. दीपक वेलणकर यांचा परिचय करून देण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढत मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्व दर्शवले. त्यानंतर स्वागत गीताने सर्वांचे मन मोहित केले.
कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मराठीतून प्रभावी भाषणे दिली आणि मराठी भाषेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यानंतर रंगतदार नृत्याविष्कार आणि साहित्याची ओळख करून देणारे पथनाट्य सादर करण्यात आले, ज्याने उपस्थितांची मने जिंकली.
मुख्य अतिथी श्री. दीपक वेलणकर यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेच्या सौंदर्याची महती सांगितली आणि विद्यार्थ्यांना तिच्या जतनासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक फादर फेलिक्स डिसोजा यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने झाली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण झाला आणि ते अतिशय उत्साहाने सहभागी झाले.
त्यांनंतर शाळेच्या नव निर्वाचित कॅप्टन आणि व्हॉईस कॅप्टन यांचा शपथ विधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुलांनी शाळेच्या प्रति आपली निष्ठा दाखवत मुख्याध्यापक फादर फेलिक्स आणि पर्यवेक्षिका सौ. शीला मॅडम यांच्या सोबत शाळेप्रती आपल्या कर्तव्य आणि जबाबदारी यांची शपथ घेतली आणि शपथ विधी समारंभ संपन्न झाला.